विस्तृत इतिहास

मराठी चित्रपट उद्योगाची नाळ कोल्हापुरशी जोडली गेली आहे आणि आजही ती तशीच आहे. मराठी चित्रपटाची सुरुवातच कोल्हापुरच्या कलात्मक दृष्टीनेच झाली. कोल्हापुरच्या मातीत बनलेल्या साधी माणसं, तांबडी माती, छत्रपती शिवाजी, मराठा तितुका मेळवावा या भालजी पेंढारकर दिग्दर्शित चित्रपटांनी इतिहास घडवला होता.

 पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणातली कथानकं मराठी चित्रपटसृष्टीला भुरळ पाडत होती. राजकीय चित्रपटांनीही मराठी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. सामना, सिंहासन यांसारख्या चित्रपटांतून दिग्गज अभिनेते दिवंगत निळू फुले आणि डॉ.श्रीराम लागू यांनी अभिनयाचा वस्तूपाठच नव्या कलाकारांना घालून दिला.

 मधल्या काळात बदलतं तंत्रज्ञान, कथानकांनी बदलेली कूस, कथा सांगण्याचे नवे तंत्र, चित्रपटाच्या यशाची नवी गणितं या सर्व गोष्टींमुळे नवी आव्हानं समोर आली. पण नव्या दमाच्या, अनुभवी अशा सर्वच कलाकारांनी हे शिवधनुष्य पेलले आणि यशाचा डंका वाजवलाच. या कलाकार मंडळींमध्ये अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, अलका कुबल, महेश कोठारे, सचिन पिळगावकर या कलाकारांची नावं घ्यायलाच हवीत. मराठी चित्रपटांनी भरपूर नफा आणि अत्यंत तोट्याचा काळही पाहिला   पण या काळात आशयघन चित्रपटही आले. पहिल्याच दिवशी हाऊसफुल ते पहिल्याच दिवशी फ्लॉप असेही अनेक चित्रपट येऊन गेले.

मराठी चित्रपटांनी  एक काळ गाजला जेव्हा सांगत्ये ऐकासारखा चित्रपट १३१ आठवडे सलग चालला. सर्व प्रकारच्या चढउतारातून चित्रपटसृष्टीने आपले अस्तित्व टिकवून ठेवले. सोबतच अनेक विक्रमही आपल्या नावावर केले

नफ्यातोट्याचे हे गणित एका बाजूला सुरु असताना मराठी चित्रपटांनी समाजाला त्याचे प्रतिबिंबही दाखवले. मनोरंजनातून प्रबोधनाची परंपरा मराठी चित्रपटांनीच जपली. मराठी चित्रपट म्हणजे लोककला, लोकसंगीत, अभिजात संगीत, लोकनृत्य आधुनिकतेचा परिपूर्ण संगमच होते. कोल्हापुरच्या जयप्रभा स्टुडिओ, शालिनी सिनेस्टोन आणि शांता किरण स्टुडिओने मराठी चित्रपटांना दिलेले योगदान विसरता न येण्यासारखे आहे.

जयप्रभा आणि शांता किरण स्टुडिओचे वैशिष्ट्य म्हणजे या स्टुडिओद्वारे निर्मित चित्रपटांनी महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यांमध्येही आपल्या कलाकृतीचा डंका वाजवला.

बॉलीवूड अर्थात हिंदी चित्रपटांचे मुख्य केंद्र म्हणून मुंबईची ओळख गडद होत असताना मराठी चित्रपटांवर त्याचा तीळमात्र परिणाम झाला नाही, याचे मुख्य कारण म्हणजे मराठी साहित्यातील दर्जेकार कथा कादंबऱ्यांवर आधारित व्यावसायिक आणि मनोरंजनात्मक या दोन्ही निकषांना मराठी चित्रपट पूर्ण करत होते.  

त्या काळातील चित्रपट निर्माते आणि अभिनेत्यांनी बदलत्या कथाशैलीला आणि तंत्राला अवगत केले आणि चित्रपटांची निर्मिती केली. यात कोल्हापुरचे व्ही शांताराम, अनंत माने, सुभाष भुर्के, डी.सी अंबपकर,अभिनेते चंद्रकांत, शंकर सावेरकर, वसंत शिंदे या श्रेष्ठ कलावंतांचा उल्लेख करायलाच हवा.

कादंबरीचे तंत्र, कथेची नवी शैली, आधुनिक तंत्रज्ञान या गोष्टी नव्या काळात कळीच्या ठरणार आहेत याची जाणीव या अभिनेतेदिग्दर्शकांना झाली होती. फिल्मसिटीसारखी आधुनिक तंत्रांनी सज्ज अशी यंत्रणाच हे करू शकते याचीही जाणीव या मंडळींना एव्हाना झाली होती.

ध्येयाने झपाटलेल्या कलाकार मंडळींनी फिल्मसिटीचे काम तडीस नेण्याचा चंग बांधला. कोल्हापूर शहराच्या दक्षिणेकडे असणाऱ्या मोरेवाडीने सर्वांचे लक्ष आता वेधून घेतले होते. सर्व औपचारिकता पूर्ण झाल्या आणि ७८ एकरांची कोल्हापूर चित्रनगरी अर्थात फिल्मसिटी सुरु झाली. कोल्हापूर फिल्मसिटी सुरु झाली १९८४ साली; पण अजून काही आव्हाने बाकी होती. १९८०९० च्या दशकात दूरचित्रवाणी आणि मालिकांनी प्रेक्षकांना आकर्षित करायला सुरुवात केली होती. चित्रपटांना आता समांतर मनोरंजन साधन म्हणून मालिका प्रसारित होऊ लागल्या. चित्रपट माध्यमाला हे एक आव्हानच होते पण ते आभासी आणि काही काळापुरतेच ठरले. चित्रपट टिकला, वाढला आणि समृद्ध होत गेला. 

मराठी चित्रपटाचा बाज लावणीप्रधान असाच होता. नव्या काळात ही ओळख मागे पडली होती ;पण कोल्हापूरात चित्रीकरण झालेल्या रवी जाधव दिग्दर्शित नटरंगया चित्रपटामुळे ढोलकीची थाप पुन्हा थिएटरमध्ये ऐकू येऊ लागली. कोल्हापुरचे साहित्यिक आनंद यादव लिखित नटरंग या कादंबरीवर आधारित या चित्रपटाने व्यावसायिक चित्रपट म्हणून मोठे यश मिळवले. चित्रपटांसोबत अलीकडच्या काळात मालिकांचे चित्रीकरणही होऊ लागले. ‘तुझ्याच जीव रंगलाया गाजलेल्या मालिकेचं चित्रीकरण कोल्हापुरातच पार पडले. त्यानंतर अनेक मराठी हिंदी मालिकांचा ओघ कोल्हापुरकडे वळू लागला.  

नव्या दमाच्या चित्रट निर्मातादिग्दर्शकांनी नवे दृष्टिकोन आणि नव्या तंत्रांचा अविष्कार केला. आता याला चित्रनगरीही साथ देत आहे. आधुनिक सुविधांसह, आरामदायी आणि हव्या त्या सेट्ससाठी आता कोल्हापूर प्राधान्याने समोर येत आहे.

प्रिप्रॉडक्शन आणि पोस्टप्रॉडक्शन या  सुविधा कोल्हापूर फिल्मसिटीत उपलब्ध नसल्या तरीही कोल्हापुरातले अनेक तंत्रज्ञ या कामासाठी सहज उपलब्ध होऊ शकतात.  प्रतिभासंपन्न कलाकृतीचे माहेरघर म्हणून कोल्हापुरने नेहमीच आपला ठसा जगभरात उमटवला आहे.