चित्रनगरीच्या भवताली अजून काय?

कोल्हापूर जवळील निसर्गरम्य वातावरण

कोल्हापूर शहर हे किल्ले, नद्या, जलाशय, तलाव या सर्व नैसर्गिक सौंदर्याने वेढलेले आहे. चला पाहूया कोल्हापुर चित्रनगरीच्या  भवताली काय आहे?

अंबाबाई मंदिर (महालक्ष्मी): वास्तुशास्त्राचा उत्कृष्ट नमुना असणारे कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर (महालक्ष्मी) चालुक्य राजवटीत बांधले गेले आहे. या मंदिराला शिलाहार आणि यादव राजांनी नंतरच्या काळात संरक्षण दिले. हे मंदिर आणि देवीची मूर्ती काळ्या पाषाणात घडवलेली आहे.

रंकाळा: रंकाळा तलाव हे कोल्हापुरसह देशभरातल्या पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. व्या शतकात तलावाची निर्मिती झाली आहे.भोवती असणारे शालिनी पॅलेस आणि पद्माराजे रंकाळा तलावाच्या सौंदर्यात भर पाडण्यात मोलाची कामगिरी बजावतात.

टाऊन हॉल: १५० वर्षांपूर्वी ब्रिटिश राजवटीत या इमारतीचं बांधकाम झालं. बांधकामाची शैली निओ गॉथिक प्रकारची आहे. आता ही इमारत वस्तुसंग्रहालयासाठी वापरली जाते. सातवाहन काळातील( इसवी सन २०० पासूनच्या) अनेक वस्तूंचे इथे संरक्षण आणि संवर्धन केले आहे.

न्यू पॅलेस: कोल्हापुरचा मानबिंदू असणारा राजघराण्याचा राजवाडा अर्थात न्यू पॅलेस काळ्या पॉलिश दगडाने लक्ष वेधून घेतो. १५० वर्षांपूर्वी बांधलेला हा राजवाडा आपल्या शाही देखणेपणामुळे आजही पर्यटकांना खुणावतो. सध्या राजवाड्यात वस्तूसंग्रहालय, कुस्तीचे मैदान तसेच राजपरिवाराने  शिकार केलेल्या प्राण्यांच्या प्रतिकृती पाहायला मिळतात.

पन्हाळा: पन्हाळा हा किल्ला शिलाहार राजांनी बांधला. नंतरच्या काळात यादवांनी हा किल्ला जिंकून घेतला. ऐतिहासिक पन्हाळा गडाला छत्रपती शिवाजी महाराजांचा बराच काळ सहवास लाभला. मराठा राज्याचा विस्तार करताना हा किल्ला एक महत्त्वाचे व्यूहरचना केंद्र होते.

जोतिबा मंदिर: कोल्हापूर जिल्ह्यात असणारे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र म्हणून जोतिबा मंदिराचा उल्लेख होतो. हे मंदिर ३०० वर्षांपूर्वी बांधले गेले आणि पुढच्या ५० वर्षांपर्यंत याचा विस्तार होत गेला. श्री जोतिबा हे दैवत महाराष्ट्रातल्या अनेक कुटुंबांचे कुलदैवत आहे.

कणेरी मठ: भगवान शिवाचे अर्थात शंकराचे प्रसिद्ध मंदिर कणेरी मठावरती आहे. कोल्हापूर जिल्ह्यासह इतर राज्यातुनही कणेरी मठावर दर्शनासाठी मोठ्या संख्येने भक्त येत असतात. दगडात बांधलेले हे मंदिर अतिशय देखणे आहे. इथे मध्ययुगीन महाराष्ट्राचं गाव उभं करण्यात आलं आहे. बलुतेदारी समाजव्यवस्थेचं चित्र नेमकेपणानं कणेरी मठावर रेखाटण्यात आलं आहे. 

कात्यायनी मंदिर: पुराणांत उल्लेख असलेल्या देवी कात्यायनीचे मंदिर कोल्हापूर शहरापासून थोड्याच अंतरावर आहे. कोल्हापूर राजघराण्यातील सदस्य शिकारीसाठी जाताना या मंदिराला भेट देऊनच जात असत.

देवी टेंबलाई: कोल्हापुरपासून जवळच असणाऱ्या टेंबलाईवाडी टेकडीवर दोन मंदिरे आहे. यापैकी मोठे मंदिर हे देवी टेंबलाईचे तर लहान मंदिर देवी यमाईचे आहे.

शहराजवळ:

नृसिंहवाडी (नरसोबाची वाडी): नरसोबाची वाडी हे दत्तात्रेयांचं पवित्र तीर्थस्थान म्हणून ओळखले जाते. कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांच्या संगमावर हे तीर्थक्षेत्र आहे. हजारो भाविक रोज इथं भेट देत असतात.

खिद्रापूर: खिद्रापूर हे १२ व्या शतकातील शिलाहार राजांच्या काळातील असून हे एक अतीशय देखणे कोरीव काम असलेले तसेच स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना असलेले मंदिर समजले जाते. या मंदिरात कोपेश्वर शिव तसेच धोपेश्वर विष्णूची स्थापना केली आहे. कट्यार काळजात घुसली या प्रसिद्ध मराठी चित्रपटामुळे या मंदिराची माहिती कित्येकांना मिळाली.

नदीचे सुरेख किनारे: कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा, पंचगंगा, वेदगंगा, दूधगंगा, हिरण्यकेशी या नद्यांमुळे भवतालचा परिसर बराच समृद्ध झाला आहे. कलात्मक दृष्टी लाभलेल्या फोटोग्राफर्सना तसेच सिनेमॅटोग्राफर्सना हे किनारे, नद्यांचे नयनरम्य घाट नेहमीच खुणावतात. चित्रपटांसाठी हे एक विलक्षण सुंदर लोकेशन आहे. हा परिसर प्रेक्षकांनाही सुंदर दृष्यांच्या माध्यमातून आकर्षित करेल यात शंका नाही.

चित्रिकरणासाठी काही ठिकाणे (Some Places for shooting)

          बऱ्याचदा दिग्दर्शकाला वास्तववादी चित्रिकरणासाठी योग्य लोकेशन्सची गरज असते. कोल्हापूर जिल्ह्यात अनेक गावात अशी लोकेशन्स उपलब्ध असून इथले लोकही चित्रपटनिर्मिती प्रक्रियेसंदर्भात बरेच उत्सुक असतात. शूटींगसाठी लागणारे सर्व प्रकारचे सहाय्य या लोकेशन्सवरती मिळू शकते.

कोल्हापूर उपहारगृहे आणि हॉटेल्स ( Eateries and Restaurants)

          चित्रीकरणासाठी खूप लांबून आलेल्या तंत्रज्ञ, कलाकारांच्या जेवणाचा प्रश्न मोठा असतो. चित्रिकरणाच्या वेळखाऊ आणि थकवणाऱ्या प्रक्रियेनंतर पोटपूजा महत्त्वाची असते. अशावेळी कोल्हापुरी मटण आणि तांबड्या पांढऱ्या रश्श्याची चव वेड लावल्याशिवाय राहत नाही. कोल्हापुरकरांचा ठसकेबाज पाहुणचार जेवणात अनुभवयाला मिळतो. दुध कट्ट्यावर मिळणारे धारोष्ण दूध, शाकाहारी तसेच मांसाहारी जेवणाची लज्जत, जगप्रसिद्ध कोल्हापुरी मिसळ आणि तिचा कट ही कोल्हापुरच्या खाद्यसंस्कृतीची ठळक वैशिष्ट्ये सांगता येतील. कोल्हापुरचा खमंग वडापाव आणि भेळही पाहुण्यांना भुरळ घालते. साहजिकच कोल्हापुरकरांचा पाहुणचार मिळालेला प्रत्येक पर्यटक भारावून जातो. बदलत्या आधुनिक कोल्हापूरात पंचतारांकित हॉटेल्ससह चित्रनगरीच्या आजूबाजूला इतरही हॉटेल्स उपलब्ध आहेत. अलीकडे कोल्हापुरात इंटरनॅशनल फूड चेनमधील हॉटेल्स,रेस्टॉरंट्स, कॅफे सुरु झाली आहेत. 

जागतिक बाजारपेठेत कोल्हापुरचे स्थान ( Market place recognised in the global )

          कोल्हापुरचे चामडी चप्पल जगभरात प्रसिद्घ आहे. सामान्य नागरिकांसह उद्योगपती, राजकारणी, अभिनेते या मंडळींनाही कोल्हापुरी चपलाचे विलक्षण आकर्षण आहे. कोल्हापुरची चप्पल लाईन स्त्रीपुरुषांसाठी चामडी चपलांचे मार्केट म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे. इथून थोड्याच अंतरावर दागिण्यांचे मार्केट असलेली गुजरी आहे. कोल्हापुरची ओळख असणारा साज केवळ इथेच तयार होतो. महिलांचा जीव की प्राण असणारा साज इथल्या कसबी कारागिरांच्य़ा हातून मागणीप्रमाणे तयार होतो. शिवाय कोल्हापूर म्हणजे गुळाची बाजारपेठ. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी गुळाच्या व्यापाऱ्यांसाठी मार्केट वसवलं आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळाली. 

          अशा अनेक गोष्टी तुम्हाला कोल्हापुरात बघायला मिळतील. शिवाय कोल्हापुरी फेटा आणि नऊवारी साडी म्हणजे स्त्रीपुरुषांच्या रुपाला सजवणारे अस्सल वस्त्रसाज. या सर्व वस्तू आणि वस्र बाजारपेठ चित्रनगरीपासून जवळच्याच अंतरावर आहे. कोल्हापुरातील फौंड्री उद्योगाने जगभरात आपल्या लौकिकाची मोहर उमटवली आहे. जगभरातल्या फौंड्री उद्योगात भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. यात कोल्हापुरचा सिंहाचा वाटा आहे. कोल्हापुर हे ऊसशेतीसाठी खूपच प्रसिद्ध आहे; साहजिकच साखर कारखाने आणि सहकार क्षेत्रामुळे जिल्ह्याची अर्थव्यवस्था मजबूत बनली आहे.

थंड आणि आल्हाददायी वातावरण

          कोल्हापूर शहर आणि परिसर थंड आणि आल्हाददायी वातावरणासाठी ओळखला जातो. शहराचं वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही ऋतूत त्रास जाणवत नाही. कोल्हापुरला लाभलेला पश्चिम घाट अर्थात सह्याद्रीचा सहवास इथल्या परिसराला जैवसमृद्धतेने मढवतो.  हिरवीगार शेती, बारमाही नद्या, आजूबाजूचे हिरवेगार डोंगर या सर्वांमुळे थंडगार वातावरण अनुभवायला मिळते. कोल्हापुरात प्रदूषणाचे प्रमाण कमी असल्याने हे वातावरण आरोग्यासाठी अत्यंत चांगले समजले जाते.